TOP Newsक्रिडाराष्ट्रिय

जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत जपानच्या द्वितीय मानांकित केंटो मोमोटावर सनसनाटी विजयाची नोंद

टोक्यो : भारताच्या एचएस प्रणॉयने बुधवारी जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत जपानच्या द्वितीय मानांकित केंटो मोमोटावर सनसनाटी विजयाची नोंद केली. प्रणॉयसह राष्ट्रकुल विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. परंतु  गतउपविजेत्या किदम्बी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आले.

दुसऱ्या फेरीत बिगरमानांकित प्रणॉयने अनपेक्षित कामगिरीचे प्रदर्शन करताना दोन वेळा माजी विश्वविजेत्या मोमोटावर २१-१७, २१-१६ असा विजय नोंदवला. आतापर्यंतच्या आठ सामन्यांपैकी प्रणॉयला प्रथमच मोमोटाला पराभूत करण्यात यश आले आहे. याआधीच्या सात सामन्यांमध्ये प्रणॉयला फक्त एकच गेम जिंकता आला होता.

लक्ष्यने स्पेनच्या लुइस पेनाल्व्हवरचा सहज पराभव करून पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्यने ७२ मिनिटे लढत देत हा दुसऱ्या फेरीचा सामना २१-१७, २१-१० अशा फरकाने जिंकला. सुरुवातीला ३-४ अशा पिछाडीवर पडलेल्या नवव्या मानांकित लक्ष्यने सहा गुण मिळवत १३-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र लक्ष्यने वर्चस्वपूर्ण खेळ करीत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी उत्तम लढत दिली. परंतु २१ वर्षीय लक्ष्यने नऊ गुणांच्या आघाडीसह नंतर गेम आणि सामनाही जिंकला.

जागतिक क्रमवारीत ३२व्या क्रमांकावरील चीनच्या झाओ जून पेंगने ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात श्रीकांतला २१-१८, २१-१७ असे हरवले.  पहिल्या गेममध्ये २९ वर्षीय श्रीकांतचा निभाव लागला नाही. फक्त १२ मिनिटांत पेंगने १-० अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने शर्थीने प्रयत्न करीत १६-१४ अशी आघाडी मिळवली. परंतु नंतर अनेक न टाळता येण्याजोग्या चुका केल्यामुळे पेंगने विजय मिळवला.

सात्त्विक-चिराग जोडीची आगेकूच

पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडय़ांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, परंतु महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी, पूजा दांडू आणि संजना संतोष, अश्विनी भट आणि शिखा गौतम या जोडय़ांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. सात्त्विक-चिराग जोडीने ग्वाटेमालाच्या जोनाथान सोलिस आणि एनिबल मॅरोक्विन जोडीला २१-८, २१-१० असे नामोहरम केले. बिगरमानांकित अर्जुन-कपिला जोडीने डेन्मार्कच्या गतकांस्यपदक विजेत्या किम एस्ट्रप आणि अँडर्स स्कारूप जोडीवर २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. अश्विनी-सिक्की जोडीने चीनच्या अग्रमानांकित चेन क्विंग चेन आणि जिया यि फॅन जोडीकडून १५-२१, १०-२१ असा पराभव पत्करला. पूजा-संजना जोडीने कोरियाच्या तिसऱ्या मानांकित ली सो ही आणि शिन सेऊंग शॅन जोडीकडून १५-२१, ७-२१ अशी हार पत्करली. दक्षिण कोरियाच्या किम सो येऊंग आणि काँग ही यंग जोडीने अश्विनी-शिखा जोडीला २१-५, १८-२१, २१-१३ असे पराभूत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button