TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

“‘आदिपुरुष’मधील रावण तालिबानी…” ‘महाभारता’त दुर्योधन साकारणाऱ्या अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचया ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर ज्या दिवशी प्रदर्शित झाला त्या दिवसापासून हा चित्रपट चर्चेत आहे. टीझर पाहिल्यानंतर यातील व्हीएफएक्स आणि रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानचा लुक याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीकाही होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर राग व्यक्त केला आहे. पण याबरोबरच ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘महाभारत’ मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारलेले अभिनेता पुनीत इस्सर यांनी यावर राग व्यक्त केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुनीत इस्सर यांनी रावण महाज्ञानी असल्याचं म्हणत जर रावणाच्या कपाळावर टिळा नसेल तर तो रावण नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांनी ‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप घेत ज्याच्याशी लोकांची आस्था जोडली गेली आहे त्या भूमिका साकारताना तुम्ही गरजेपेक्षा जास्त लिबर्टी घेऊ शकत नाही असं म्हटलं आहे.

‘आदिपुरुष’मधील रावणाच्या भूमिकेला होत असलेल्या विरोधाला पुनीत इस्सर यांनी समर्थन दिलं आहे. ते म्हणाले, “क्रिएटीव्ह लिबर्टीच्या नावाखाली कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक इतिहासाचं खंडन करू शकत नाही. रावणाला ४ वेद आणि ६ शास्त्रांचं ज्ञान होतं. त्याच्यापेक्षा मोठा शिवभक्त कुणीही नव्हता. त्याला शिवाचं वरदान होतं. मग जर रावणाच्या कपाळावर टिळा नसेल तर तो रावण होऊ शकतच नाही.”

पुनीत इस्सर यांनी याच मुलाखतीत चित्रपटाच्या निर्मात्याने संतप्त सवाल केला आहे. ते म्हणाले, “लिबर्टीच्या नावाखाली तुम्ही सीख गुरूंना मिशा नसलेले दाखवू शकता का? मग रावणाबरोबर असं का केलं? तो पूर्णपणे अलाउद्दीन खिल्जी किंवा तैमूर यांच्यासारखा दिसतोय. त्यामुळे लोकांचा यावर संताप स्वाभाविक आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची निर्मिती करताना याची काळजी घ्यायला हवी.”

पुनीत इस्सर पुढे म्हणाले, “टीझरमध्ये तुम्ही प्रभू रामाला पिळदार मिशा असलेल्या दाखवत आहात. पण रावणाचे केस कापलेले आहेत. त्याला स्पाइक्स लूक दिला आहे. ज्यामुळे तो पूर्णपणे तालिबानी असल्यासारखा दिसत आहे. तुम्ही रावणाला तालिबानी का ठरवत आहात?”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button