breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करुन टाका म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना राऊतांचं उत्तर; म्हणाले, “ते वेडे आहेत, त्यांची…”

मुंबई |

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याने सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधींना युपीएला पुनर्जिवित करण्यासाठी सल्ला दिला असून काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही असंही म्हटलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे मिनी युपीएचाच भाग असल्याचंही सांगितलं आहे. मात्र युपीएत सामील होण्यासंबंधी शिवसेनेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावरुन भाजपा नेते टीका करत असून त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. शिवसेनेला एकदाचं काँग्रेसमध्ये सामील करुन टाका असा सल्ला देणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत…त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असं सांगेन”.

“शरद पवार किंवा त्यांच्या वयाचे, उंचीचे नेते या देशात आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देणं यामुळे त्रास होत असेल तर तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. मोठ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना त्रास आहे, शारिरीक वेदना आहेत त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे,” असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे”.

 

पुढे ते म्हणाले की, “त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालूप्रसाद यादव असे जरी कोणी नेते आले असते आणि तर त्यांनाही असा त्रास असता तर नक्की मी त्यांना स्वत: ही खूर्ची आणून दिली असती. कारण राजकारणात जरी मतभेद असले तरी ते पितृतूल्य लोकं आहेत”.

“कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button