ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमुंबई

रतन टाटा यांचे मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन

मतदान करावे आणि जबाबदारीने करावे

मुंबई : मुंबईत सोमवारी मतदान आहे. मी सर्व मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि ते जबाबदारीने करावे’, असे आवाहन ज्येष्ठ व प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांनी शनिवारी आपल्या ‘एक्स अकाऊंट’च्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना केले. त्यांच्याप्रमाणेच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा, अभिनेता सलमान खान, अक्षयकुमार, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर अशा अनेक मान्यवरांनीही सोशल मीडियावर व्यक्त होत मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.

‘जगभरात अनेकांना जो हक्क नाही, तो आपल्याला आहे. तो मतदानाचा हक्क मी २० मे रोजी बजावणारच आहे. तुम्ही तुमच्या मतदार नोंदणीबाबत साशंक असाल तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या वेबसाइटवर तपासून घ्या आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा भाग व्हा’, असे आवाहन आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’वर केले आहे. ‘मुंबई पोलिस आयुक्त या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की, मतदानाचे आपले कर्तव्य अवश्य पार पाडा’ अशी पोस्ट मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘एक्स’ वर केली आहे.

‘मुंबईकरांनो आपला खासदार निवडण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच संधी मिळते. चुकूनही ही संधी घालवू नका. रविवारी सुट्टीचा आनंद लुटा आणि सोमवारी आपल्या देशासाठी कर्तव्य पार पाडा. नक्की मतदान करा. आली रे आली आता, आमची मतदानाची बारी आली’, अशा शब्दांत अभिनेता अक्षयकुमारने मतदारांना आवाहन केले. तर ‘मी शनिवार-रविवारचा दिवस पाहून फिरायला बाहेर पडत आहे. परंतु, सोमवारी सकाळीच मी मुंबईत परत येऊन मतदानाचा हक्क बजावणार आहे. आपण मतदान नाही केले तर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा आपला नैतिक हक्क आपण गमावून बसतो. त्यामुळे मतदान करणे हे आपल्या लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचे कर्तव्यही आहे. म्हणूनच प्रत्येकाने मतदान करावे’, असे आवाहन प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी यांनी ‘एक्स’वर केले.

‘आपले मुंबई पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य करत असतात. सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत त्यांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. शासन मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझी अपेक्षा आहे की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून देशातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मुंबईतून असायला हवी. दुसरे म्हणजे मतदान नाही केले तर आपल्याला बोलण्याचा हक्क राहत नाही. केवळ फेसबुक व सोशल मीडियावर बोलून उपयोग नाही. त्यामुळे मतदान करून प्रश्न विचारण्याचाही हक्क मिळवा’, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेता व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही ‘एक्स’वर केले. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, प्रसिद्ध हास्यकलाकार समीर चौघुले, अभिनेता नितीन मुकेश आदींनीही ‘एक्स’वर पोस्ट करून मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button