मेट्रोच्या कामासाठी लकडी पूल १२ सप्टेंबरपर्यंत रोज रात्री बंद
![Wooden bridge closed for Metro work every night till September 12](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pune-6.jpg)
पुणे– शहरातील वर्दळीचा पूल म्हणून ओळखला जाणारा लकडी पूल म्हणजेच संभाजी महाराज पुलावरील वाहतूक मेट्रोच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आजपासून १२ सप्टेंबरपर्यंत रोज रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहील, अशी माहिती पुणे वाहतूक विभागाने दिली आहे.
पुण्यात वनाज ते जिल्हा न्यायालय दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यात संभाजी महाराज पूल येथे मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या काळात रोज रात्री ११ ते पहाटे ६ या काळात २० दिवस या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यासाठी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या मार्गाच्या नागरीकांनी टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरी वाडा, वर्तक बाग, कॉसमॉस बँक, जंगली महाराज रोड या मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक विभागाने म्हटले आहे.