TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याला वाढीव पाणी मिळणार का?

खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याचा पुणे महापालिकेकडून होत असलेला अनियंत्रित पाणी वापर आणि पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेकडून होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज घेणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीत शहराच्या वाढीव पाणीकोट्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून प्रतिवर्षी तब्बल २३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीवापर होत असल्याचे समोर आले आहे. तसेच महापालिकेला प्रतिमाणशी १५० लिटर पाणी अनुज्ञेय असताना प्रत्यक्षात प्रतिमाणशी २७० लिटर पाण्याचा वापर होत आहे. महापालिकेकडून जास्त पाणी वापर होत असल्याने शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी केला आहे.

महापालिकेला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून ११.६० टीएमसी, पवना प्रकल्पातून ०.३४ टीएमसी, तर भामा आसखेड प्रकल्पातून २.६७ टीएमसी असे एकूण १४.६१ टीएमसी पाणी सन २०३१ साली होणाऱ्या संभाव्य ७६.१६ लाख लोकसंख्येसाठी मंजूर आहे. मात्र, सध्या महापालिका खडकवासला धरणातून १४५१ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी), कालव्यातून १७४ एमएलडी असे एकूण १६२५ एमएलडी पाणी उचलते. याशिवाय पवना (रावेत बंधाऱ्यातून) ३० एमएलडी, भामा आसखेड धरणातून १४० एमएलडी असे दररोज एकूण १७९५ एमएलडी पाणी उचलण्यात येते. या सर्वांचा वर्षाचा हिशोब केल्यास प्रतिवर्षी महापालिका २३.१३ टीएमसी पाण्याचा वापर करत आहे. जलसंपदा विभागानेही यासंदर्भात आक्षेप नोंदविले आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २२ सप्टेंबर २०१७ च्या निकषानुसार महापालिकेने दररोज १५० लिटर प्रतिमाणशी या मापदंडाप्रमाणे पाणी वापरण्याचे आदेश आहेत. मात्र, महापालिकेचा दररोजचा पाणीवापर प्रतिमाणशी तब्बल २७० लिटर एवढा आहे.याशिवाय महापालिकेच्या पाणीवितरणात तब्बल आठ टीएमसी पाण्याची गळती होत असल्याची कबुली खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे पाणी गळती रोखण्यासाठी महापालिका कोणत्या उपाययोजना करत आहे, समान पाणीपुरवठा योजनेची सद्य:स्थिती काय आहे, जास्तीचा पाणी वापर रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील आणि कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा ?
पाणी गळती, पाणी गळती रोखण्यासाठी होत असलेल्या उपाययोजना, शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता पुण्याला वाढीव पाणीसाठा या मुद्द्यांवर ही बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता पुण्यासह ग्रामीण भागालाही समन्यायी पद्धतीने पाणी देण्याचे आव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button