कुणी पाणी देता पाणी…
जांभुळगाव येथील एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलात सुमारे 250 रहिवाशांची पाण्यासाठी वणवण
![who-water-water-jambhulgaon-exerbia-abode-complex-water-forest](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-23-at-8.01.54-PM-780x470.jpeg)
– आठवडाभरपासून पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणी नसल्यामुळे लहानग्यांसह-वयोवृद्धांची प्रचंड गैरसोय
– आमदार सुनील शेळके यांनी बिल्डर व्यवस्थापनाला खडसावले
वडगांव मावळः येथील जांभुळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारलेल्या एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी संकुलात गेल्या आठ दिवसांपासून पाणीच आले नसल्यामुळे येथील महिलां, पुरुष, लहानग्यांसह-वयोवृद्धांची प्रचंड गैरसोय होत आहे. या ठिकाणी सुमारे अडीचशे लोकवस्ती असून, विकसकाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी वीज आणि पाण्याची नेहमीच वाताहत होत असते. याबाबत आमदार सुनील शेळके यांच्यासोबत येथील रहिवाशांनी भेट घेतली असून, बिल्डरच्या व्यवस्थापनाचे आमदार शेळके यांनी कान टोचले असून, लवकरच याबाबत तोडगा काढू व पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन बिल्डर व्यवस्थापनाने आमदार शेळके यांना दिले आहे.
स्वत:चे घर असावे, असे स्वप्न अनेकांकडून पाहिले जाते. वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून, अपार कष्ट करून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली जाते. अशातच पुण्यात तेही समृद्ध मावळ तालुक्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले मात्र, बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे येथील रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र याबाबत आम्ही बिल्डर व्यवस्थापनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता याबाबत आम्ही पाईप लाईन कनेक्शन दुरुस्तीचे तसेच वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम करत आहोत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलाचे फायनान्स व्यवस्थापक साई केळकर यांनी महाईन्यूजला सांगितले.
जांभुळगाव येथील एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलात विज आणि पाण्याची भीषण समस्या गेल्या आठ दिवसांपासून भेडसावत असून, या ठिकाणी विकासकाने बोरवेल देखील मारलेली नाही. गावाजवळी इंद्रायणी नदीशेजारी एक विहिर बांधलेली आहे. त्या विहिरीतून या गृहप्रकल्पासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र महावितरणचे बिल थकवल्यामुळे वीज कपात करण्यात आली आहे. परिणामी येथील रहिवाशांना होणारा पाणीपुरवठादेखील गेल्या आठ दिवसांपासून ठप्प झाला आहे.
हेही वाचा : महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
पाणी येत नसल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत असून, अंघोळीशिवाय मुलांना शाळेत जावे लागत आहे. तर येथील महिला जांभुळगावात इतर ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहेत, त्या ठिकाणी पाईप लावून पाणी भरत आहेत. वीज नसल्यामुळे लिफ्ट सुविधाही बंद आहे. त्यामुळे सातव्या मजल्यापर्यंत जारने पाणी नेले जात आहे.
येथील रहिवाशांनी बिल्डर व्यवस्थापनास वेळोवेळी फोन केले. मात्र बिल्डरने याकडे गांभिर्याने न पाहता, केवळ पाणी आणि वीज चालू करण्याचे आश्वासन दिले. परिणामी वैतागलेल्या रहिवाशांनी मावळचे लोकप्रतिनिधी सुनील शेळके यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी आमदार शेळके यांनी बिल्डर व्यवस्थापनास कॉल करून याबाबत जाब विचारला. व येथील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यास निक्षूण सांगितले. मात्र अद्याप या ठिकाणी पाणी आणि विजेची समस्या कायम असून, येथील रहिवाशी वैतागले आहेत.
घर मिळाले मात्र आम्ही फसलो, रहिवााशांच्या भावना
हा गृहप्रकल्प पूर्ण होऊन पाच वर्षे झाली. मात्र अद्याप रहिवाशी संकुलाची स्थापना केलेली नसून, बिल्डर व्यवस्थापनाने रहिवाशांना सोसायटी हस्तांतरीत केलेली नाही. आतापर्यंत बिल्डरच या ठिकाणचा सर्व कारभार पाहत असल्यामुळे बिल्डरची मनमानी सुरू आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर या ठिकाणी घर घेऊन पश्चाताप झाल्याची वेळ आली आहे, अशा संतप्त भावना येथील रहिवाशी व्यक्त करत आहेत.
फाईट फॉर राईट संघटनेच्या वतीने आमदार शेळके यांना साकडे
एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलातील रहिवाशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या फाईट फॉर राईट या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी तात्काळ सूत्रे हलवत बिल्डर व्यवस्थापनाला कॉल केला व सद्या परिस्थितीची माहिती घेतली. व येथील रहिवासांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात. अन्यथा मोर्चा काढण्यात येईल एव्हढेच काय तर मी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करेन, अशा प्रकारे बिल्डर व्यवस्थापनाचे कान टोचले. यावेळी फाईट फॉर राईट संघटनेचे प्रकाश कांबळे, अनंत गुळवे, जितेंद्र पाल, दीपिका वाकडे, मनिषा कुंभार, शालिनी जाधव, अनिषा उतेकर, दत्तात्रय ठोसर, भिमसेन गडांकुश, जॉन घोडके, सोमेश्वर काळे, रवींद्र सुतार आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
बिल्डर व्यवस्थापनाने एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलातील रहिवाशांच्या समस्या तात्काळ सोडविल्या नाहीत तर बिल्डरच्या कार्यालयावर येथील रहिवाशांसोबत मोर्चा काढू. मी स्वतः या मोर्चाचे नेतृत्त्व करेन. काही झाले तरी या ठिकाणच्या रहिवाशांना न्याय मिळवूनच देणार. मावळ तालुक्यातील कुठेही जर असा प्रकार घडत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही.
– सुनील शेळके, आमदार, मावळ विधानसभा
सकाळी लवकर आम्हाला ऑफिसला जावे लागते. मात्र अंघोळीला पाणी नसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कामावरच गेलेलो नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे बाहेरून पाणी आणावे लागतेय. आमदारांनी याबाबत बिल्डरची कानउघडणी केली आहे. आता बघू बिल्डरला आमची दया येतेय का.
-दीपिका वाकडे, रहिवाशी एक्झर्बिया अबोड संकुल, जांभुळगाव
पाणी नसल्यामुळे सकाळी मुलांना अंघोळीशिवाय शाळेत पाठवत आहोत. मुलेही अंघोळीशिवाय शाळेत जायला मागेनात. घरातील स्वयंपाकाला पाणी नाही. पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय आहे. बिल्डरने आमच्या संकुलात जाणिवपूर्वक पाण्याचा दुसरा स्त्रोत उपलब्ध केलेला नाही. किमान बोअरवेल तरी मारायला हवी होती. जेणेकरून वापरायचे पाणी तरी उपलब्ध झाले असते.
-अमोल दिसले, रहिवाशी एक्झर्बिया अबोड संकुल, जांभुळगाव