breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona : संत निरंकारी मिशनतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाख रुपयांची मदत; पीएम फंडात ५ कोटीचा निधी

पुणे। महाईन्यूज । प्रतिनिधी

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे पावन मार्गदर्शन व आशीर्वादाने संत निरंकारी मिशनचे प्रबंधक आणि सेवादार भक्तगण कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या देशभरातील लक्षावधी बंधु-भगिनींची सेवा करत आहेत.

कोरानाचा व्यापक संसर्ग रोखण्यासाठी दिनांक २४ मार्च, २०२० रोजी माननीय पंतप्रधान यांनी देशभर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर हातावर पोट असलेले अनेक लोक आणि त्यांचे कुटुंबिय प्रभावित झाले. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोचविण्याबाबत मिशनच्या देशभरातील ९५ झोन आणि त्याअंतर्गत असलेल्या सुमारे ३००० शाखांना मिशनच्या वतीने निर्देश देण्यात आले. त्यानुसार लगेचच मिशनचे भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक मदत कार्यासाठी पुढे सरसावले आणि त्यांनी लाखो लोकांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरवात केली.

         पुणे जिल्ह्यातील जनता-वसाहत, गंगाधाम, मार्केटयार्ड, धनकवडी, गोकुळनगर, भोर, खडकी, जय-जवान नगर, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, पेरणे-फाटा, केंदूर, मोरेवस्ती, बालाजीनगर, दिघी, आळंदी, चऱ्होली, शिक्रापूर, चाकण,खेड येथील १५०० हुन अधिक गरजू कुटुंबाना या जीवनावश्यक वस्तूंमध्ये लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतके तांदुळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहा अशा विविध वस्तूंचा समावेश होता. या व्यतिरिक्त दररोज सुमारे १ लाख लोकांना ताजे जेवण (लंगर) वितरीत केले जात आहे. देशभरात सुमारे १ लाखाहून अधिक कुटुंबांना आतापर्यंत हे राशन वाटप करण्यात आले आहे.

मिशनच्या वतीने माननीय पंतप्रधान सहायता निधीमध्ये ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून महाराष्ट्रासह, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आदि राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये प्रत्येकी रु.५० लाख इतके अर्थसहाय्य दिलेले आहे.  

  मिशनच्या या महान मानवतावादी सेवेचे मा.पंतप्रधान यांनी ट्वीटद्वारे कौतुक केले असून  संबंधित मुख्यमंत्री महोदयांनीही मिशनच्या योगदानाची प्रशंसा केली आहे.

मिशनच्या कित्येक शाखांकडून पोलीस विभाग, आरोग्य विभाग प्रशासकीय सेवांमध्ये संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांसहित गरजू लोकांना भोजन आणि चहापान देण्याची सेवा करत आहेत. मिशनच्या जबलपुर शाखेने ४२०० मास्क तयार करुन संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

मिशनची समाज कल्याण शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनेही वर्तमान परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरतील असे विविध उपक्रम राबवत आहे. फाउंडेशनने दिल्ली सरकारला डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी १०००० पीपीई किट उपलब्ध करुन दिले आहेत.  फाउंडेशनकडून प्रवासी श्रमिकांना राशन प्रदान करण्याचे कार्य केले आहे. फाउंडेशन द्वारे चालविण्यात येत असलेल्या शाळा कॉरंटाईनसाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. शिवाय या वैश्विक आणीबाणीच्या काळात रक्तदानाचे उपक्रम राबविले जात आहेत.

 संत निरंकारी मिशनने आपली सत्संग भवने गरज पडल्यास राज्य अथवा केंद्र सरकारकडून क्वारंटाईन केंद्रे उभारण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहेत. दिल्लीतील यमुनानगर येथील सत्संग भवन यापूर्वीच क्वारंटाईन केंद्र म्हणून वापरात आले आहे.  

दिल्लीसह देशातील शेकडो शहरांमध्ये मिशनच्या वतीने मदतकार्य चालू असून महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोलीसह राज्यभरातील मिशनच्या शाखांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.

   संत निरंकारी मिशन मागील ९० वर्षांपासून आध्यात्मिक जागरुकतेच्या आपल्या मुलभूत विचारधारेद्वारे मानवाचा गुणात्मक विकास करण्याबरोबरच सामाजिक उत्थान, मदत व पुनर्वसन कार्यामध्ये आपले योगदान देत आहे. मिशनच्या यापूर्वीच्या सद्गुरुंप्रमाणेच वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज या प्रेम व बंधुत्वाच्या मिशनला आपल्या दिव्य मार्गदर्शनाने पुढे घेऊन जात आहेत. कोरोना संकटाच्या दरम्यान सद्गुरु माताजींनी भक्तगणांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे, की सेवा करताना सर्वांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे.  

      सद्गुरु माताजींचे कथन आहे, की या विश्वातील समस्त मानवमात्र आपले बंधु-भगिनी आहेत आणि त्यांची सेवा करणे आपले कर्तव्यच आहे. त्यांची सेवा करुन आपण कोणावर उपकार करत नाही.  

  मिशनने या संकटमय परिस्थितीत देशाबरोबर उभे राहण्याची प्रतिज्ञा केलेली असून हे संकट लवकरात लवकर दूर व्हावे म्हणून मिशनच्या वतीने प्रार्थनाही करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वत्र शांतीसुखाचे वातावरण स्थापित व्हावे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button