भारत बायोटेकच्या लस प्रकल्पाला परवानगीची प्रतिक्षा
![Waiting for permission for Bharat Biotech's vaccine project](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/covaxin-.jpg)
पुणे | मांजरी येथील भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी भेट दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लसनिर्मितीचा आढावा घेतला. कंपनीने लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले भारतीय औषध महानियंत्रक (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया -डीसीजीआय) यांच्याकडे अंतिम परवान्यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे भारत बायोटेकला डीसीजीआयच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.
या प्रकल्पातून करोना प्रतिबंधक लसनिर्मिती करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कंपनीच्या वतीने लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी डीसीजीआयकडे अंतिम परवान्यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (द सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कण्ट्रोल ऑर्गनायझेशन) पथकाकडून प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे.
कंपनीकडून कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन या प्रकल्पातून करण्यात येणार आहे. सध्या करोनाची तिसरी लाट असून लसीकरण मोठय़ा प्रमाणात झालेल्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक असली, तरी गंभीर रुग्णांचे आणि मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी आहे.
त्यामुळे भारत बायोटेकच्या प्रकल्पातून लसीचे उत्पादन सुरू होणे आवश्यक आहे. या कंपनीमध्ये लस उत्पादनाची रंगीत तालीम झाली आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्य:स्थितीचा आढावा घेतला. राज्य आणि जिल्हास्तरावरील कंपनीसाठी अत्यावश्यक असलेले परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी डीसीजीआयची परवानगी मिळाल्यानंतर त्वरीत उत्पादन सुरू होईल.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी