आझम स्पोर्ट्स अकादमी, डार्क अकादमी यांची विजयी सलामी
आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा; वॉव क्रिकेट, आर्यन्स संघ पराभूत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sanjay-Raut-1-2-780x470.jpg)
पुणे : आझम स्पोर्ट्स अकादमी व डार्क अकादमी या दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर आजपासून सुरु झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन एमसीएसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. आज झालेल्या पहिल्या लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने वॉव क्रिकेट संघाला ७७ धावांनी पराभूत करताना विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४८ धावा केल्या. सलामीवीर संजना शिंदेने ४२ चेंडूत ४९ (७ चौकार) धावांची तर कर्णधार किरण नवगिरेने १७ चेंडूत ३० (६ चौकार) धावांची धडाकेबाज खेळी केली. ऋतुजा गलबिले १०, अनुष्का वाईकर १७, मानसी तिवारीने १० धावा करताना संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. वॉव संघाकडून साक्षी पानसरे, सोनाली शिंदे, अक्षया जाधव यांनी प्रत्येकी २ तर सिद्धी राणे व श्रुती पवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा – नवाब मलिक अजित पवार की शरद पवार गटात? अजित पवारांचं सूचक विधान
शरयू कुलकर्णी व कर्णधार किरण नवगिरे यांच्या भेदक गोलंदाजी समोर वॉव संघाचा डाव १८ षटकांत सर्वबाद ७१ धावांवर संपुष्टात आला. शरयू कुलकर्णीने ६ धावांमध्ये ३ तर, किरण नवगिरेने २ गडी बाद करताना अर्धा संघ तंबूत धाडला.त्यांना संजना शिंदेने २ तर अनुष्का वाईकर व मानसी तिवारीने प्रत्येकी १ गडी बाद करताना सुरेख साथ दिली. वॉव संघाकडून श्रुती पवारने १६ (३ चौकार) तर सिद्धी राणे १२ (३ चौकार) यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला. बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही.
दुसऱ्या लढतीमध्ये डार्क अकादमी संघाने आर्यन्स संघाला 5 गडी राखून पराभूत करताना स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. आर्यन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत 5 बाद ११८ धावा केल्या. यामध्ये भक्ती पवारने ३८ चेंडूत ४२ (६ चौकार), गायत्री सुरवसेने ३९ चेंडूत २२ (१ चौकार) मारताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. श्रावणी जमादारने नाबाद १४, शुभांगी पाटोळेने १३ तर अभिलाषा पाटीलने ११ धावा केल्या. डार्क अकादमी संघाकडून रिशिता सायकरने २ तर क्रीशी ठक्कर व सहेज कौर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
डार्क संघाने केवळ १५.१ षटकांत ५ बाद ११९ धावा करताना विजय साकारला. श्वेता जाधवने नाबाद २६ चेंडूत ४४ (७ चौकार) धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. तिला इशा घुलेने १८, क्रीशी ठक्करने ११ तर पल्लव बोडकेने १० धावा करताना श्वेता सुरेख साथ दिली. आर्यन्स संघाकडून स्नेहा शिंदेने २ तर अभिलाषा पाटील व गायत्री सुरवसे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.