‘सीरम’कडून लशीची किंमत जाहीर; सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी वेगवेगळा दर
![Vaccine price announced from 'Serum'; Different rates for public and private hospitals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/4adar_20poonawala_20main.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या लसीची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये इतकी किंमत सीरमने निश्चित केली आहे. त्याचबरोबर सीरमच्या उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित ५० टक्के लस या राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनाद्वारे सीरमने हे जाहीर केलं आहे.
सध्या देशात जी लसीकरण मोहिम सुरु आहे, ती केंद्र सरकारकडून नियंत्रित केली जात आहे. यासाठी लागणारे लसींचे डोसही केंद्र सरकारने सीरमकडून विकत घेतले आहेत. तसेच ते राज्यांना आणि खासगी लसीकरण केंद्रांना वितरीत केले आहेत. मात्र, यापुढे आता राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना स्वतंत्ररित्या हे डोस विकत घ्यावे लागणार आहे.
परदेशी लशींच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त
सीरमने आपल्या निवदेनात म्हटलं की, भारत सरकारच्या निर्देशांनंतर आम्ही कोविशिल्ड लसीच्या किंमतींची घोषणा करत आहोत. त्यानुसार, राज्य सरकारांसाठी या लसीची किंमत ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस असेल. परदेशी लसींच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त असल्याचंही सीरमनं म्हटलं आहे. त्यानुसार, अमेरिकन लसीची किंमत १५०० रुपये प्रतिडोस, रशियन लस प्रतिडोस ७५० रुपये तर चीनी लस प्रतिडोस ७५० रुपये असल्याचं सीरमने आपल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे.