शिवसृष्टी उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर
![Union Home Minister Amit Shah on a visit to Pune on the occasion of the inauguration of Shiv Srishti](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-17T091017.782-780x470.jpg)
पुणे : पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून नऱ्हे, आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होईल. शिवसृष्टीची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त जगदीश कदम यांनी ही माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा या वेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवसृष्टी प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडाचे लोकार्पण शहा करणार आहेत. सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड-किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका आदी प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत.
चार टप्प्यात तयार होत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च साधारण ४३८ कोटी रुपये इतका आहे. पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपये देणगीदारांकडून प्रकल्पाला मिळाले आहेत. ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या १२ हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला सुरुवात झाली आहे, असे कदम यांनी सांगितले.
नजीकच्या भविष्यात पूर्णत्वास येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये २१ एकर परिसरात एक दिवसाची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार असून महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिॲलिटीद्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, शिवकालीन अस्त्रांचे शस्त्रागार, दरबार, महाराजांनी सुरू केलेल्या चलनी शिवरायी व राजमुद्रा, अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदिर, विजयस्तंभ, राजवाडा, नगारखाना या ठिकाणी पहायला मिळेल. मॅड मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिवप्रेमी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकू शकतील, हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे. २१व्या शतकात वावरणाऱ्या प्रत्येक टेक्नोसॅव्ही व्यक्तीला येथे आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असा हा प्रकल्प आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा हा १ डिसेंबर पासून शिवप्रेमींसाठी खुला होणार असून यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही कदम यांनी नमूद केले.