सभागृहात एकमत, बाहेर दिखाऊ विरोध ; राष्ट्रवादी काँग्रेसची दुहेरी भूमिका कायम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाच्या बाजूने मंजुरी दिली आहे.
पुणे | सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून बहुमताच्या जोरावर अहितकारक प्रस्ताव मान्य केले जात असल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. करोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या कालावधीत महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी प्रस्तावित कॉफी टेबल बुकला विरोध दर्शवून महापालिका भवनात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीमध्ये कॉफी टेबल बुकची निर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चाला मान्यता दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आधी मंजुरी, मग विरोध किंवा आधी विरोध नंतर प्रस्तावाच्या बाजूने मान्यता अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळय़ा भूमिका कायम राहिल्या आहेत.
करोना संसर्गाच्या दोन वर्षांत महापालिकेने केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ३९ लाख रुपये खर्च करून कॉफी टेबल बुकची निर्मिती करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. विकासकामांसाठी तिजोरीत खडखडाट असताना कॉफी टेबल बुक करण्यासाठी महापालिकेकडे पैसा आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले होते. करोना संकटात ९ हजार ११४ नागरिकांना प्राण गमवावा लागले. मात्र कामांची जाहिरात करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुणेकरांच्या हक्काच्या निधीला हात घातला आहे.
या विरोधात राज्य शासनाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले होते. या आंदोलनाला चार दिवस होत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाच्या बाजूने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका पुन्हा पुढे आली आहे.
यापूर्वीही अनेकदा भूमिका बदल
स्मार्ट सिटीच्या अॅडॉटिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चालाही राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला होता. त्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात आले होते. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मान्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला नव्हता. मुख्य सभेपुढे प्रस्ताव आल्यानंतर उपसूचना देत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते.