भूमिगत गटाराची स्वच्छता करताना दोघांचा मृत्यू
शिरूर : शिरूर औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनीत भूमिगत गटाराची स्वच्छता करताना चेंबरमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र दादाभाऊ काळे (वय ४२, शिंदोडी, ता. शिरूर), सुभाष सुखदेव उघडे (वय ३४, रा. शिरूर) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनीत काळे आणि उघडे हे दोघे भूमिगत गटाराची स्वच्छता करीत होते. त्यावेळी सुभाष उघडे हे पाय घसरून चेंबरमध्ये पडले. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी मच्छिंद्र काळे यांनीही चेंबरमध्ये उडी घेतली. उघडे यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दोघांना इतरांनी बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघेही मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दत्तात्रय दादाभाऊ काळे (रा. शिंदोडी. ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सरजिने हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.