महापालिकेतही आता वाहतूक नियोजन विभाग; आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली मान्यता

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी अपर पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहरासाठी शहर वाहतूक सुधारणा समिती नेमण्यात आली आहे. त्या नंतर आता महापालिकेतही केंद्र शासनाच्या नागरी वाहतूक धोरणानुसार वाहतूक नियोजन विभाग स्थापन करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नुकतीच या विभागास मान्यता दिली आहे. तसेच या विभागासाठी ८ जणांची नियुक्तीही या आदेशाने करण्यात आली आहे.
या विभागाकडे शहरातील वाहतूक कोंडीसह, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रकल्प, या प्रकल्पांचे काम करणाऱ्या संस्थांशी समन्वय, तसेच शहरातील वाहतूक नियमन आणि नियमांबाबत पोलीस प्रशासना सोबत समन्वय ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. महापालिकेडून या पूर्वी शहरासाठी प्रकल्प व वाहतूक नियोजन विभाग कार्यरत करण्यात आला होता.
मात्र, त्या माध्यमातून परिणामकारक काम होत नसल्याने आता हा स्वतंत्र विभाग असणार असून, त्यांच्याकडे फक्त वाहतूकीची जबाबदारी असणार आहे. या नवीन विभागाची जबाबदारी महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांच्यावर देण्यात आली असून, त्यांच्या सोबत दोन कार्यकारी अभियंता, १ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंते तसेच वाहतूक नियोजनकार म्हणून निखील मिजार यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
या कामांची असेल विभागाकडे जबाबदारी
– शहरातील वाहतुकीच्या नियमांबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधून सुसूत्रता निर्माण करणे.
– शहरातील २४ मीटर व त्यावरील रुंदीच्या रस्त्यावरील पदपथ सायकल ट्रॅक, सब-वे, उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर, मेट्रो, एलआरटी, एचसीएमटीआर,
निओ मेट्रो या प्रकल्पांची अंमलबजावणी करणे.
– पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, एसटी, पीएमपीएमएल, महामट्रो या विभागांशी समन्वय साधणे.
– वाहतूक व्यवस्थेचे सुटसुटीत व सुरळीत नियोजन करणे.
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे.
– वाहतूक विषयक समस्यांवर उपाययोजना करणे, त्या अनुषंगाने धोरण ठरवणे व अंमलबजावणी करून घेणे.