महाराष्ट्रात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का? स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

पुणे | पुणे शहरातील स्वारगेट येथील बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून सरकारला जाब विचारला आहे.
सुप्रिया सुळे यांनी या बलात्काराच्या घटनेवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
हेही वाचा : हिंजवडी परिसरात परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय
पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली आहे याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.