महाशिवरात्रीसाठी पुण्यात वाहतूक बदल; फरासखाना व येरवडा परिसरात विशेष नियोजन

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त शहरातील फरासखाना व येरवडा परिसरातील शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी (ता. १५) विविध मार्गांवर तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
फरासखाना वाहतूक विभागाअंतर्गत पुण्येश्वर रस्ता व अगरवाल रस्त्यावरी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. यावेळी कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौक, जिजामाता चौक, गणेश रस्त्यामार्गे पुढे जावे. तर सूर्या हॉस्पिटलकडून पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शिवाजी रस्ता, जिजामाता चौकातून डावीकडे वळून जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीबाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कर्जमाफीचा निर्णय…”
त्याचबरोबर येरवडा वाहतूक विभागामार्फत तारकेश्वर चौकाकडून गुंजन चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. त्यानुसार तारकेश्वर चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांनी शादलबाबा चौकातून उजवीकडे वळून आंबेडकर चौकातून त्यांना इच्छित स्थळी जाता येईल.
संगमवाडीकडून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूकही वळविण्यात येणार असून संगमवाडीकडून येणाऱ्या वाहनचालकांना आंबेडकर चौकातून उजवीकडे वळून पुढे जाता येईल. तर, चंद्रमा चौकातून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून त्यांना शादलबाबा चौकातून डावीकडे वळून आंबेडकर चौक मार्गे गोल्फ क्लब चौकातुन पुढे जाता येईल, असे वाहतूक पोलिसांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.




