शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीबाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कर्जमाफीचा निर्णय…”

Uday Samant : गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासह आदी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठं शेतकरी आंदोलन केलं होतं. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जून २०२६ मध्ये करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘शेतकरी कर्जमाफीबाबत अगोदरच निर्णय झाला’, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकित कर्जाची माहिती मागवण्यात आलेली आहे. बँकांना शेतकऱ्यांच्या थकित कर्जांबाबत माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री उदय सामंत यांना विचारला.
हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणाले; ‘मुलुंडमधील घटना दुर्देवी, राज्य सरकार चौकशी करणार…’
यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अगोदरच निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करायची? हे देखील राज्य सरकारने ठरवलेलं आहे. त्या संदर्भातील डेटा कलेक्ट झाला पाहिजे म्हणून सध्या ही कार्यवाही सुरू आहे”, असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सूचवण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय घेतला होता. ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करेल आणि त्यामध्ये समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करून ३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं.
सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर उदय सामंत यांनी तेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर एक महत्वाचं भाष्य करत म्हटलं होतं की, “कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार आहे, याचाही आराखडा तयार झालेला आहे. जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने करणार आहोत, याची देखील यादी तयार होईल. त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. सर्वात महत्वाचं हे आहे की ज्या पद्धतीने शब्द आपण देतो, तो शब्द पाळण्याची ताकद देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे”, असं उदय सामंत यांनी याआधीही म्हटलं होतं.




