मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टायर फुटून कारला अपघात! मुंबईचे २ जण ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Accident-1.jpg)
लोणावळा | प्रतिनिधी
मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या सुसाट कारचा मंगळवारी ताजे गावाजवळ टायर फुटून भीषण अपघात झाला. त्यात प्रकाश बसवनाथ घोडके आणि राजमती नागेश गाडेकर हे मुंबईतील २ जण जागीच ठार झाले असून अन्य एक महिला जबर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई येथून पुण्याकडे निघालेली कार एक्सप्रेस वेवरील कामशेतजवळच्या ताजे गावाजवळ आली तेव्हा वेगात असलेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे ती उलटली. त्यानंतर तिने तीन ते चार वेळा पलट्या मारल्या. त्यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर शालन शरणाप्पा घोडके ही महिला जबर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाला होता. मात्र अपघातग्रस्त कार बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.