‘त्या वाहनांची कसून तपासणी करावी’; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन आयुक्तांना केल्या सूचना

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील चालकाने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पुण्यातील सर्व शाळांमधील बस, व्हॅन आणि रिक्षाचालक यांची कसून तपासणी व्हावी.
चालक आणि मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी करावी, असा सूचना विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन आयुक्त भीमनावर यांना दिल्या आहेत.
हेही वाचा – PCMC UPDATE: चिखली घरकुल समस्या सोडवण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’वर उपाययोजना!
महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम २०११, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन निर्णयानुसार शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी वारंवार व्हावी. वाहनांवरील चालक, इतर मदतनीस यांची चरित्र तपासणी पोलीस विभागामार्फत व्हावी. प्रत्येक वाहनांमध्ये महिला मदतनीस असावी.
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात बसवू नये. वाहनाचा वेग मर्यादित असावा. वाहन पूर्णतः तंदुरुस्त असावे. शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासमोर वाहनचालक आणि सहायक यांना सूचना द्याव्यात. वाहनचालकांची शारीरिक व मानसिक चाचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करावी, असे गोऱ्हे यांनी सांगितले.





