मावळ तालुक्यात उद्या तिसरी महालसीकरण मोहीम, आणखी 10 हजार डोस उपलब्ध – आमदार शेळके
![Third Mahalsikaran campaign in Maval taluka tomorrow, another 10 thousand doses available - MLA Shelke](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/unnamed-3.jpg)
पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मावळ तालुक्यासाठी कोविशिल्ड लसीचे आणखी 10 हजार डोस उपलब्ध झाले असून (शुक्रवार 17, शनिवार 18 सप्टेंबर) संपूर्ण मावळ तालुक्यात तिसरी महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या महालसीकरण मोहिमेचा मावळातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.
लसीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी स्पर्धा करताना लसीकरण केंद्रांवर होणारे अनावश्यक वादविवादाचे प्रसंग टाळून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. प्रत्येकाचे लसीकरण होईपर्यंत शासनामार्फत लसीकरण सुरूच राहणार आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी व कोविडचे नियम पाळून कोविड मुक्त मावळसाठी प्रयत्नांना साथ द्यावी, अशी विनंती आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेला केली आहे.
यापूर्वी तालुक्यात 31ऑगस्टला 15 हजार तर 13 सप्टेंबरला 18 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची गती कायम ठेवण्यासाठी आमदार शेळके यांनी विशेष पाठपुरावा करून आणखी 10 हजार डोस उपलब्ध करून दिले आहेत.
या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्र असे एकूण 40 ठिकाणी 18 वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्डच्या पहिल्या व पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या दुसरा डोससाठी लसीकरण होणार आहे. तरी कोविडचे सर्व नियम पाळून गर्दी न करता सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.
या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त केंद्रांवर लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. सर्व केंद्रांवर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यानंतरही आवश्यकतेनुसार लसीकरण सुरू राहील. लसीकरणासाठी एकदम गर्दी करू नये.
सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा, प्रसारमाध्यमे व नागरिकांच्या सहकार्यामुळे गेले दीड वर्षापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोविड रुग्णांच्या उपचारात सहभागी आहे. तसेच गेल्या सात महिन्यांपासून लसीकरणाच्या कामकाजामध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामकाज पाहत आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यात 2 लाख 70 हजारांहून अधिक लाभार्थींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.