इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणासोबत महिलेने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आणि…
पुणे | पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यातून फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका महिलेने 31 वर्षीय तरुणासोबत इंस्टाग्रामवरुन ओळख वाढवली. नंतर त्याला भेटायला बोलावले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या काही साथीदारांच्या मदतीने या महिलेने त्या तरुणाचे अपहरण केले आणि त्याचे 50 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
याप्रकरणी 31 वर्षीय तरुणाने तक्रार दिल्यानंतर एक महिला आणि तिच्या तीन साथीदारांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणाची आणि आरोपी महिलेची ओळख इन्स्टाग्राम वर झाली होती. त्याच ओळखीतून या महिलेने तरुणाला कोंढवा परिसरात भेटण्यासाठी बोलावले. हा तरुण देखील तिला भेटण्यासाठी मोठ्या उत्साहाने गेला. त्यानंतर या महिलेने त्याला जबरदस्तीने शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार पार पडल्यानंतर फिर्यादी आपल्या कारमधून परत जात असताना तिघांनी त्याची कार अडवली आणि जबरदस्तीने कारमध्ये बसले.
या इसमांनी त्याला मारहाण केली आणि इंस्टाग्राम वरील एका महिलेसोबत तू बलात्कार केला आहेस त्याची पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर या महिलेसोबत लग्न करावे लागेल असे एका कागदावर लिहून घेतले आणि त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यावेळी तरुणाने त्याच्याजवळ रोख 50 हजार रुपये आणि एटीएम कार्डमधून तीस हजार रुपये काढून आरोपींना दिले. दरम्यान हा तरुण घरी गेल्यानंतर देखील वारंवार त्याला पैशाची मागणी होऊ लागल्याने त्याने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.