विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव, हिवाळी अधिवेशनात मंजूर प्रस्ताव केंद्राकडे पाठवला
पुणे/नागपूर : येथील लोहगाव विमानतळाचे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे पुर्ननामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नागपूर हिवाळी विधानसभा अधिवेशनात मांडला. त्याला तत्काळ मंजुरी देण्यात आली.
लोहगावमध्ये तुकोबारायांचे आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकाराम महाराजांचे नाते जिव्हाळ्याचे राहिले आहे. लोहगावचे गावकरी आणि तमाम वारकरी संप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती.
हेही वाचा – मुद्रांक शुल्क कायद्यात सुधारणा करताना सर्व घटकांवरील परिणामांचा विचार व्हावा’; आमदार अमित गोरखे
या भूमिकेवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन पुर्ननामकरण करण्याचा शासकीय ठराव नागपूर हिवाळी विधानसभा अधिवेशनात मांडला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ११० अनुसार पुणे लोहगाव विमानतळ येथील विमानतळाचे “जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,’ असे पुर्ननामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. तो केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.