‘जुने टर्मिनलही सुसज्ज करणार’; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-5-780x470.jpg)
पुणे : विमानतळावरील नवीन टर्मिनलवरील डीजी यात्रा सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून, सुलभ सेवा मिळणार आहे. आता जुने टर्मिनलचेही नूतनीकरण करायचे, की ते पाडून नवीन उभारायचे यावर चर्चा सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होऊन ते नवीन टर्मिनलसारखेच सुंदर आणि सुसज्ज करणार असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुणे विमानतळावरील डीजी यात्रेचा शुभारंभ मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. या वेळी या डीजी यात्रेचे पहिले प्रवासी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण ठरले. प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, स्वरदा बापट, भारतीय विमानतळ प्राधिकारणाचे सरव्यवस्थापक पी. के. दत्ता, पुणे विमानतळ संचालक संतोष डोके, सीआयएसएफचे प्रमुख संतोष सुमन उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, की देशात चार कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी डीजी यात्रेचा लाभ घेतला आहे. देशातील सर्वाधिक मोठ्या २४ विमानतळावर ही सेवा सुरू करण्यात आली असून, एकूण प्रवाशांची संख्या पाहता ७० ते ७५ टक्के प्रवाशांनी लाभ घेतला आहे. कमी वेळेत चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्याचा प्रवाशांना फायदा होत असल्याने प्रवाशी समाधानी आहेत.
उडानच्या माध्यमातून दीड कोटी प्रवासी जोडले गेले आहेत. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर परदेशातील विमानांच्या स्लॉट मिळण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. पुणे शहराची लोकसंख्या ७० लाखापर्यंत गेली आहे. पुढील ५० ते १०० वर्षांचा विचार करून धावपट्टीच्या विस्तारासाठी भूसंपादन करण्यात येईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत सूचनाही दिल्या आहेत.
सध्या सर्वेक्षण पूर्ण झाले असून, धावपट्टी विस्तारासाठी लागणारी जागा, त्यामध्ये संरक्षण दलाची किती जागा शिल्लक आहे आणि खासगी जागा किती, हे स्पष्ट होईल. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले.