‘मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांड निर्णय घेतील’; नाना पटोले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Shankar-Jagatap-2-1-780x470.jpg)
पुणे : महाविकास आघाडीतील काही जागा वाटपांंचा तिढा हा वाटाघाटीतून नक्कीच सुटणार आहे. महाराष्ट्र वाचविण्यासाठी, तसेच महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांमधून आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा आता थांबवली पाहिजे.त्याबाबत हायकमांड निर्णय घेतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यांना जास्त मनावर घेण्याची गरज नसल्याचा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या कार्यक्रमास ते आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना ८५-८५-८५ यानुसार जागा वाटपावर एकमत झालेले आहे.
हेही वाचा – मिशन विधानसभा : पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत ‘‘विजयी शंखनाद’’
काही जागांचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पाठवणार असून, शुक्रवारी (दि. २५) सायंकाळपर्यंत उमेदवारांची पहिली यादी फायनल होऊन ती जाहीर करण्यात येईल, असेही पटोले यांनी सांगितले. आता मुख्यमंत्रिपदाची चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याने चर्चा थांबवली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काही जागांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत महायुतीतील नेते टीका करत असले, तरी महायुतीतही जागा वाटपावरून महाभारत सुरू आहे.महायुतीचे सर्वकाही दिल्ली दरबारात ठरत असते, असे म्हणत पटोले यांनी महायुतीवर टीका केली आहे. महायुती शासनाने शासकीय जमिनी विकण्याचा घाट घातला. त्यामुळे महाराष्ट्र वाचविण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाबाबत दावा केला जात आहे. चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्रिपदाचे नाव सांगितले का? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. अजून मतदान झालेले नाही, लवकरच चित्र स्पष्ट होईल. त्यांनी आधी तिजोरीवर डाका टाकला आणि आता जनतेच्या मतावर डाका टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोलाही पटोले यांनी महायुतीला लगावला.