‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याचा बालेवाडी येथे शुभारंभ
‘पुणे ग्रँड टूर’मुळे पुण्याचे नाव जागतिक पातळीवर : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे | ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून, याबाबत केंद्र सरकारसह देश-विदेशातील सायकलपटूंनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याचे प्रशंसोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘पुणे ग्रँड टूर’च्या अंतिम टप्प्याला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेच्या (युसीआय) महासंचालक अमिना लानाया, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, अभिनेता अमीर खान, बजाज ऑटोचे कर विभागाचे उपाध्यक्ष चेतन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले. या स्पर्धेला शहर व ग्रामीण भागातील क्रीडारसिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला असून, युवक, युवती, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी सर्व घटकांचा त्यात सहभाग दिसून आला. यापूर्वी पुण्यात झालेल्या स्पर्धेलाही पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
हेही वाचा : १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी अभिनव देसाई याची महाराष्ट्र संघात निवड

आगामी ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भारताला मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असून, क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि प्रतिभावंत खेळाडू घडावेत या उद्देशाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आले आहे. राज्यासह देशात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत राहील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, ‘पुणे ग्रँड टूर’चे महाराष्ट्र सरकार व जिल्हा प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेत क्रीडा क्षेत्राचा मोठा वाटा असणार असून, देश क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करताना दिसत आहे. क्रीडा क्षेत्राला ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासन व प्रायोजकांच्या सहकार्याने स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जागतिक पातळीवरील खेळाडूंना एकत्र आणून क्रीडा पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला असून, भारत क्रीडा पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी अभिनेता अमीर खान यांनीही ‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. दरम्यान, जर्मनीचे सायकलपटू बेंडकी बेकर यांना यावेळी मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. बेकर यांनी सलग २० वर्षे सायकलपटू म्हणून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, या स्पर्धेनंतर ते सायकलिंगमधून निवृत्त होत आहेत.




