कात्रज ते नवले ब्रिज रस्त्यावर कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले
पुणे | कात्रजकडून नवले ब्रिज कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वाराला चिरडले. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल राजेंद्र खरात असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री 11: 40 च्या सुमारास मयत व्यक्ती हा दुचाकीने कात्रजकडून नवले ब्रिजच्या दिशेने जात होता. आंबेगाव बुद्रुक येथील बस स्टॉप समोर त्याची दुचाकी आली असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनर ने धडक दिली. त्यानंतर संबंधित दुचाकीचालक हा रस्त्यावर पडला असता कंटेनरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.