प्रस्थान सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री येणार आळंदीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/www.mahaenews.com-9-1-780x470.jpg)
Alandi : आषाढी वारी पालखी प्रस्थान निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शन आणि इंद्रायणी प्रदुषण पाहणी दौ-यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी तीन वाजता मंदिरामध्ये येणार आहेत.
सुमारे दोन तासांचा दौरा आळंदीत आहे. यापूर्वी आघाडी सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी गृहखाते असताना आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी आले होते.मात्र मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाटी येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेली काही वर्षे इंद्रायणी प्रदुषणाचा मुद्दा चर्चिला जात आहे. त्यातच मागील महिनाभर अखंडपणे इंद्रायणीच्या पाण्यावर पांढरा फेस आल्याने नदी प्रदुषणाचा विषयाची जोरदार चर्चा वारक-यांमधे होत होती. अशा प्रदुषित पाण्यामधे वारकरी गेली कित्येक वर्षे तिर्थस्नान करतात. आचमन करतात. मात्र काळवंडलेले पाणी आणि पाण्यावर आलेला फेस पाहून यंदाच्या वारीत मात्र वारक-यांच्या भावना तिव्र होत्या. वारकरी आणि आळंदीकरांनी याबाबत नाराजीही व्यक्ती केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत आज इंद्रायणी नदीचा पाहणी दौरा आयोजित केला आहे.आता श्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
हेही वाचा – पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात, १४ वर्षांच्या मुलाने टँकरने तिघांना उडवलं
दरम्यान या आधी मुख्यमंत्री शिंदे आळंदीतील माऊलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी तीन वाजता आळंदीत येतील. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळा पाहतील. यावेळी वारकरी संप्रदायाशी हितगुज साधणार आहे.त्यानंतर पाच वाजता इंद्रायणीची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांचेसमवेत प्रदुषण नियंत्रण मंडळाची पथकही असेल. त्यानंतर सव्वा पाच वाजता लोहगाव विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.
मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणताही मुख्यमंत्री पदावर असताना आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी आले नव्हते.मुख्यंत्री शिंदे पहिलेच मुख्यमंत्री प्रस्थानसाठी आळंदीत येत आहे. यामुळे आळंदीकरांसाठी कुतूहलाचा विषय आहे. याचबरोबर दुसरीकडे राज्यसरकारने वारक-यांनी दिंडीक-यांसाठी वीस हजारांचे देवू केलेले अनुदानावर ब-यापैकी टिका विरोधक तसेच वारकरी संप्रदायातूनही झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आळंदीत येणार असून वारक-यांसाठी काय हितगुज साधणार याचीही उत्सुकता आळंदीकर,दिंडीकरी,वारक-यांना आहे.
दरम्यान आळंदी नगरपरिषदमार्फत केलेल्या चाकण चौकातील तुळशी वृंदावन चौक सुशोभिकरणाचे पाहणी आणि वारक-यांना शिवसेनेतर्फे दिल्या जाणा-या मोफत छत्र्या, रेनकोटचे वाटप केले जाईल. मात्र हे त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार कार्यक्रम होणार आहे.