शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-7-780x470.jpg)
पुणे : “सीबीएसई’ पॅटर्नप्रमाणेच राज्य बोर्डाच्या शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनऐवजी १ एप्रिलपासून करण्याचा प्रस्ताव सुकाणू समितीने शासनाला दिला आहे. हा निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
या धोरणाअंतर्गत विविध वयोगटासाठी शैक्षणिक पातळ्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्या पातळ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या प्रस्तावाची अंमलबजावणी २०२६-२७ पासून सुरू होणार आहे. त्याआधी शाळा, शिक्षक व पालक यांना नवीन प्रणालीबद्दल माहिती देण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती पावले उचलली जातील. त्यानंतर अंतिम आदेश काढला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष ३१ मार्चला संपून दि. १ एप्रिलपासून सुरू होण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाला वेळ देणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा – चंद्रचूड यांच्यावर खटला भरला पाहिजे, संजय राऊत यांची मागणी
सीबीएसईच्या पॅटर्नप्रमाणेच राज्यातील अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. गणित व विज्ञान या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या सुलभतेमुळे विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी होईल आणि त्यांना रचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असे शिक्षण विभागातील तज्ज्ञांनी सांगितले.