सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ : सुपर लीग आणि अंतिम सामना पुण्यात रंगणार

Syed Mushtaq Ali Trophy | भारतामध्ये सुरू असलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या साखळी फेरीचे सामने जोरात सुरू आहेत. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा यांसारखे स्टार खेळाडू मैदानात उतरल्याने स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १२ डिसेंबरपासून सुपर लीग फेरी आणि १८ डिसेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने सुपर लीग आणि अंतिम फेरीच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीतील सुपर लीग आणि अंतिम फेरीतील सामने याआधी इंदुरमध्ये खेळवले जाणार होते. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोलकाता, हैदराबाद , अहमदाबाद आणि लखनौत सुरू आहेत. तर सुपर लीग फेरीतील सामन्यांचं आणि अंतिम फेरीतील सामन्याचं ठिकाण आता बदलण्यात आलं आहे. हे सामने इंदुरऐवजी आता पुण्यात खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा : युरोपियन युनियनकडून एलॉन मस्क यांच्या ‘X’ ला १४० दशलक्ष डॉलर्सचा दंड
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा निर्णय मध्य प्रदेश संघातील खेळाडूंनी केलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आला आहे. बीसीसीआयने सामने इंदुरहून पुण्यात खेळवण्यासाठी लॉजिस्टिकचं कारण दिल आहे. खेळाडूंसाठी पुरेशे हॉटेल रुम्स उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हटलं गेलं आहे. यासह १३ ते १६ डिसेंबर दरम्यान याच मैदानावर डॉक्टरांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील या २ मैदानांवर होणार सामने
या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने ठरलेल्या ठिकाणी होणार आहेत. पण सुपर लीग फेरीतील सामने पुण्यातील गहुंजे आणि डॉ. डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अॅकेडमीच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. ज्यात हार्दिक पंड्या, आयुष म्हात्रे, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. १२ डिसेंबरपासून सुपर लीग स्पर्धेतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. तर १८ डिसेंबरला स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे.





