स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार उलगडणारे अभिनेते शरद पोंक्षे यांचं गगनभेदी व्याख्यान उत्साहात!
राष्ट्राय स्वाहा संस्थेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
![Swadhinata Veer, Savarkar, Vichar, actor Sharad Ponkshe, Gaganbhedi, Lectures, Enthusiasm, Nation, Swaha, Programs, Organizing,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/savarkar-780x470.jpg)
पुणेः हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन राष्ट्राय स्वाहा या संस्थेने पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात नामवंत अभिनेते, लेखक, विचारवंत शरद पोंक्षे यांचे सावरकरांचे विचार अधोरेखित करणारे तसेच त्या विचारांचे विश्लेषण करून त्या विचारांची गरज पटवून देणारे श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणारे जबरदस्त व्याख्यान पार पडले.
आपल्या शब्दफेकीच्या कौशल्यावर तसेच प्रभावी वाणीने मोठ्या संख्येने आलेल्या पुणेकर रसिक श्रोत्यांना पोंक्षे यांनी मंत्रमुग्ध करून टाकले.
सावरकरांचे विचार इतक्या प्रभावीपणे शरद पोंक्षे यांनी मांडले की समस्त रसिक वेळेचे भान आणि इतर गोष्टी विसरले. सर्वजण बाहेर येताना भारावून अन् विचारांचे अतुल्य सोने घेऊनच बाहेर पडले. आजच्या काळात सर्वच क्षेत्रात चाललेली भेसळ कमी करायची असल्यास सावरकरांच्या विचारांना पर्याय नाही.आणि नव्या पिढीने ते आत्मसात करावेत असे प्रतिपादन पोंक्षे यांनी केले.
राष्ट्राय स्वाहा या माणसातले माणूसपण जपणाऱ्या आणि स्वतः चा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाची अव्याहत सेवा करणाऱ्या संस्थेने दिवस रात्र ध्यास घेऊन या खास व्याख्यानाचे आयोजन केलं होतं.
या कार्यक्रमाला आखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच बडेकर ग्रूप, भारती सहकारी बँक, शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीहरी मराठे, संध्या मराठे, चिंतामणी कुलकर्णी, विद्या कुलकर्णी यांच्या विशेष सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.