‘शिरुर लोकसभा मतदार संघाच्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
चुकीची माहिती न पसरवण्याचे केले आवाहन
![Suhas Diwase said that all the data of CCTV filming in the strong room of Shirur Lok Sabha constituency is safe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Suhas-Diwase-1-780x470.jpg)
पुणे | शिरुर लोकसभा मतदार संघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही संपूर्णत: कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकेल अशी चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघातील स्ट्राँगरुमच्या सीसीटीव्ही डिस्प्लेच्या अनुषंगाने माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने डॉ. दिवसे यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, मतदानानंतर स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएम आणताना त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात. त्यानंतर त्या स्ट्राँगरुममध्ये सीलबंद केल्या जात असतानाही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या प्रत्येक सीलींग प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. स्ट्राँगरुम सील करण्यापूर्वीच त्याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आलेली असते. त्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे होत असलेल्या चित्रीकरण पाहण्याची व्यवस्था एका वेगळ्या खोलीत डिस्प्लेवर केलेली असते.
भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम साठवणूक केलेल्या स्ट्राँगरुमला आतील भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, दुसऱ्या भागात राज्य राखीव पोलीस बल आणि तिसऱ्या भागात राज्य पोलीस दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात येते. तसेच याठिकाणी वॉच टॉवर व त्याअनुषंगिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येते. या संपूर्ण भागाचे चित्रीकरण केले जाते ते उमेदवारांच्या प्रतिनिधींना पाहण्याची व्यवस्था करण्यात येते.
शिरुर लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करुन रांजणगाव येथील गोदामात साठवणूक करण्यात आले आहेत. मतदानापूर्वी दोन दिवस पूर्वीच सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली होती. गोदामात साठवणूक केलेले ईव्हीएमचे चित्रीकरण बघण्यासाठी साठवणुकीपूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींना सीसीटीव्ही संनियंत्रण कक्षातून चित्रीकरण पाहता येण्याबाबत सूचना देण्यात येतात.
हेही वाचा – ‘मोदी होते म्हणून राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा झालं नसतं’; राज ठाकरे
सीसीटीव्ही चित्रीकरण पाहण्याकरिता उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना नेमणूक पत्र देऊन त्यांचे सुरक्षा पासेस निवडणूक कार्यालयातून तयार करुन घेण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुरुवातीस राजकीय पक्षांकडून प्रतिनिधी नेमण्यात आले नव्हते. आता शिरुर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्यावतीने प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत. सीसीटीव्ही डिस्प्लेदेखील त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तांत्रिक किंवा पावसासारख्या तात्कालिक कारणामुळे डिस्प्ले बंद झाला असला तरी चित्रीकरण सुरू असते व संपूर्ण डेटा एकत्रित करण्याचे काम सुरू असते. हा डेटा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने मागणी केल्यास पाहण्यासाठी उपलब्ध असतो.
त्यामुळे काही माध्यमांमधून आलेल्या वृत्तांमध्ये तथ्य नाही. अशा प्रकारच्या बातम्या निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यासह जनतेची दिशाभूल करु शकतात.
पाऊस, वारा आदीमुळे तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्या बाबीचे संनियंत्रण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्यात आलेले आहे. मात्र, सीसीटीव्ही यंत्रणेने नोंदविलेला सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवून नये, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.
स्ट्राँगरुमची जिल्हाधिकाऱ्यांडून पाहणी
रांजणगाव येथील शिरुर लोकसभा मतदार संघाच्या स्ट्राँगरुमला जिल्हाधिकारी डॉ. दिवसे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी आज स्वत: भेट देऊन पाहणी केली. येथील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती घेऊन सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.
सीसीटीव्ही यंत्रणा आधिपासूनच कार्यान्वित आहे. ईव्हीएम यंत्रे स्ट्राँगरुमला ठेऊन सीलबंद करत असताना उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र त्यानंतर ते थांबले नव्हते. दुसऱ्या दिवसापासून उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. परंतु, सीसीटीव्ही यंत्रणा पहिल्यापासून कार्यरत असून सर्व डेटा सुरक्षित आहे.
– अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, शिरुर लोकसभा मतदार संघ