पुण्यात निर्बंध कठोर, नवी नियमावली जाहीर
![Strict restrictions in Pune, new rules announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Pune-lockdown.jpeg)
पुणे | प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, लग्न समारंभाला बंद जागेत १०० लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली असून मोकळ्या जागेत २५० माणसांमध्ये लग्न करता येणार आहे. तर, जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेल्समध्ये ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. राजकीय, धार्मिक कार्यक्रमात 100 लोकांनाच परवानगी असणार आहे. रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांच उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमायक्रोनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण वाढत असल्याने पुण्यात निर्बंध कठोर करण्यात येत आहेत. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात ओमिक्रॉनचे रुग्ण जलदगतीने वाढताना दिसून आले, त्यामुळेच राज्य सरकारने आता नाताळाच्या सणाला होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध कडक केले आहेत.
पुण्यात रात्रीची जमावबंदी लागू
पुण्यातली नाईट लाईफ नेहमीच चर्चेत असते, अनेक हॉटेल, पब, बारमध्ये अनेक कार्यक्रमात लोकांची गर्दी होते, हीच गर्दी टाळण्यासाठी पुण्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, लोक नियम मोडताना दिसून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच लग्न समारंभालाही काही लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. ओमिक्रॉनमुळे जगावर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे, भारतालाही तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्यामुळे सर्वच राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासाठी सरकार कठोर पावलं उचलत आहे. सरकारकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ द्यायचं नसेल तर नियमांचे काटेकोर पालन करा.