चांदणी चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-9-1-780x470.jpg)
पुणे : चांदणी चौकात स्वराज्य शिल्पावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६० फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेने या पूर्वी या ठिकाणी महापालिकेने केलेल्या आराखड्यानुसार स्वराज्य निर्मिती शिल्पामधील १७ फूट उंचीच्या चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉझ धातूमधील २० फुट उंचीचा व अंदाजे २ हजार ४५० किलो वजनाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंज़ुरी दिली होती.
मात्र, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह शहरातील शिवप्रेमी नागरिक संघटनांनी प्रस्तावित पुतळ्याची उंची ६० फूट करावी, शिल्प परिसरात ४५ मीटर उंचीचा झेंडा दगडाच्या भिंती व फुलझाडे उभारून सुशोभित करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा – पुरंदर विमानतळाच्या भू संपादनासाठी स्वेच्छा खरेदी जाहीर करा; आमदार विजय शिवतरे आग्रही
शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून चांदणी चौक ओळखला जातो. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या चौकात पुलाच्या परिसरात वारजेकडे जाणारा रस्ता व मुळशीकडून कोथरूडकडे जाणारा उड्डाणपूल आणि सातार्याकडून मुंबईकडे जाणार्या मार्गाच्या सेवा रस्त्यामध्ये उपलब्ध असलेल्या साडेपाच हजार चौरस मीटर जागेत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेला दिला होता. त्यानुसार भवन विभागाने सुधारित आराखडा तयार करून ६० फूट उंचीचा पुतळा उभारण्यासंबधीचा आराखडा तयार करून स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवला होता.