… ‘तर सुप्रिया सुळेंच्या पाठिशी ५३ पैकी ४३ आमदार असते’; मुख्य प्रवक्ते उमेश पाटील
‘सिंह’’ हा मागील अनेक वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या राशीतून ‘‘कन्या’’ राशीत झुकलेला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/WhatsApp-Image-2024-01-20-at-1.24.38-AM-780x470.jpeg)
पुणे : ‘‘सिंह’’ हा मागील अनेक वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या राशीतून ‘‘कन्या’’ राशीत झुकलेला आहे. म्हणूनच गृहदोष निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून खा. सुप्रिया सुळेंना सर्वप्रथम राज्यसभेची खासदारकी दिली गेली. त्यानंतर महाराष्ट्राला सुप्रियाताईंचं कर्तृत्व आणि पात्रता समजली. त्यांच्यात तेवढी पात्रता असती तर आज ना. अजितदादांच्या पाठिशी असलेले ५३ पैकी ४३ आमदार त्यांच्यासोबत असते, अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
उमेश पाटील म्हणाले की, खा. सुप्रिया सुळे या संसदपटू आहेत. संसदरत्न, महारत्न आहेत. त्यांचं हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्व आहे. एवढं सगळं असताना दिल्लीत आणि इतर राज्यांमध्ये पक्ष का पसरला नाही? राष्ट्रीय पक्ष असताना इतर राज्यांमध्ये पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक का निवडून आले नाहीत? सुप्रियाताईंनी देशभर फिरून पक्ष का वाढवला नाही? त्यांनी पक्ष वाढवला असता, त्यांच्या माध्यमातून देशभरात १००-२०० आमदार-खासदार निवडून आले असते तर त्यांच्यामधली गुणवत्ता, पात्रता प्रमाणित झाली असती.
हेही वाचा – ‘दोन आपत्यावर थांबा, लोकसंख्या खूप वाढली’; अजित पवार यांची पिंपरीत फटकेबाजी
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९० ते ९५ टक्के आमदारांचा ना. अजितदादांना पाठिंबा आहे. लोकशाहीत ज्याच्या पाठिशी आमदार-खासदार असतात, तोच नेता असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असेही उमेश पाटील यांनी म्हटले आहे.