शिरुरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची ‘बारी’ : खासदार अमोल कोल्हे यांचे ‘वरातीमागून घोडे’ : माजी खासदार आढळराव पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/adhalraopatil-amolkolhe-pune.jpg)
पुणे । प्रतिनिधी
दावडी निमगाव येथील श्री खंडोबा जत्रेत झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी घोडी धरली, तो प्रकार पाहता ‘वराती मागून घोडे’ असेच म्हणावे लागेल. लोकांना करमणूक करण्यासाठी आलेले कोल्हे हे नौटंकी केली, अशी जोरदार टीका माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळवण्यासाठी ‘‘हा पठ्ठया लढेल आणि पहिल्या बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून बारी धरेल..’’ असे आश्वासन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले होते.
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर दि.११ फेब्रुवारी रोजी लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत भरवली होती. या शर्यतीला आढळरावांनी डॉ. कोल्हे यांना आमंत्रण दिले. मात्र, त्याठिकाणी कोल्हे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.
दरम्यान, निमगाव दावडी येथे श्रीक्षेत्र खंडोबाच्या जत्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत खासदार अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसून आश्वासन पूर्ण केल्याचा दावा केला. यावर आढळरावांनी जोरदार टीका केली आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, मावळातील नानोली येथे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. त्याठिकाणी प्रमुख आकर्षण खासदार कोल्हे होते. मात्र, त्याठिकाणीसुद्धा कोल्हे उपस्थित राहिले नाहीत. पण, नाटकी हातवारे करणे आणि आक्राळविक्राळ बोलणे… असा प्रकार करुन कोल्हे लोकांची दिशाभूल करीत आहेत.
खासदार कोल्हे खोटं बोलत आहेत : आढळराव पाटील
खासदार कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांना खोटे सांगितले, दि.११ आणि १२ फेब्रुवारी रोजी मी दिल्लीत होतो. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना उपस्थित राहू शकलो नाही, असा दावा कोल्हे यांनी केला. मात्र, कोल्हे या दोन्ही दिवशी दिल्लीत नव्हते. दुसरीकडे, मी राजकीय शर्यती किंवा बक्षीसे असलेल्या ठिकाणी माझे आश्वासन पूर्ण करणार…असेही कोल्हे कधी भाषणात म्हटलेले नाहीत. त्यामुळे काहीतरी कारणे शोधून कोल्हे शेतकऱ्यांशी खोटं बोलत आहेत.
बैल पुढे पळाले…आणि यांची घोडी मागे… : आढळराव पाटील
प्रचलित पद्धतीनुसार बैलगाडा शर्यतींमध्ये बैलांच्या पुढे घोडी पळत असते. मात्र, कोल्हे यांनी नाटक आणि सिनेमातील घोडी आणली होती. वास्तविक, ते खोगीर होते. तरीही घोडी म्हणून पळवली. त्यात बारी पाडली… आणि गाडामालकांचा भ्रमनिरास केला. कोल्हे घोडीवर बसले. घोडी बैलांच्या मागे राहिले. त्यामुळे खोगीरावर बसून कोल्हे यांनी बारी पाडली. शेतकऱ्यांची घोडी न घेता नाटकात काम करणारी घोडी पळवून शेतकऱ्यांची थट्टा केली, असा दावाही आढळराव पाटील यांनी केला आहे.