शिवसैनिक आक्रमक ! अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्याचा इशारा
पुणे | केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद पार पडली तर उद्या ते पुणे दौऱ्यावर असून शहरात त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसैनिकांनी अमित शाह येत असलेल्या कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हा इशारा दिला आहे. बंगळुरात घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी अमित शहा यांची भेट घेणार आहेत. परंतु यासाठी अमित शहा आणि वेळ दिला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.तर दुसरीकडे कर्नाटकात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी पुण्यात येणाऱ्या कर्नाटकचा बसेसवर भगव्या रंगाने छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवसेना पुणे असे लिहून त्या बस कर्नाटकाकडे मार्गस्थ केल्या.