शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर..! सुप्रिया सुळेंची घोषणाबाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-14-1-780x470.jpg)
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूकाचा सामना रंजक असणार आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
आज १८ एप्रिल रोजी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, सध्या दोन्ही बाजूंनी जोरदाररित्या शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीतील शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे रविंद्र धंगेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित सभेत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची तोफ धडाडल्याचं दिसून आलं.
“विद्यमान खासदारांनी बारामतीमध्ये विकासनिधी आणला नाही,” असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देत सुप्रिया सुळे यांनी “कदाचित माझा मराठीतला कार्य अहवाल वाचला नसावा.मी आजच माझा अहवाल त्यांना पाठवून देईन. त्यांनी यासाठी थोडासा जरी वेळ काढला तर उद्या सकाळी ते मेरीटवर मलाच मतदान करतील,” असा दावा केला आहे.
हेही वाचा – भगवा ध्वज नाचवत खासदार बारणे यांचा श्रीराम नवमी शोभायात्रांमध्ये सहभाग
मी नशिबवान आहे, मला तुतारी हे चिन्ह मिळालं. तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. आपल्याला ही तुतारी रविंद्र धंगेकर यांच्याहाती द्यायची आहे.शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली. आमच्या एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हाती मशाल आहे. रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.
यावेळी सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. “शरद पवारही आमच्याकडे येणार होते पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला”, असा दावा फडणवीसांनी केला होता.
त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस खरं बोलले यासाठी मी त्यांचे आभार मानते. काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे, त्यांना शरद पवार किंवा आमच्या कुणाही विरोधात षडयंत्र करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नव्हता,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.