स्वारगेट प्रकरणातील नराधमाच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर आक्रमक

पुणेः स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी गुनाट गावातील स्थानिकांच्या मदतीने काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक केली. मंगळवारी घडलेल्या या घटनेने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. नराधम आरोपीने एका २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये अतिप्रसंग केला होता. या घटनेची स्वारगेट पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आणि आरोपीचा शोध काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
त्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. आज त्याला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालया पुढे हजर करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या आहेत. याविषयी त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली.
हेही वाचा – रस्ते तीस दिवसांत अतिक्रमणमुक्त? कारवाईचे वेळापत्रक निश्चित, ‘पीएमआरडीए’चा महत्त्वपूर्ण निर्णय
स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून रात्री 1.30 वा. पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सलग 3 दिवस आरोपीचा जलद गतीने शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांच्या 13 पथकांसह संयुक्त कारवाईत शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथक तैनात केले होते. याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करतच आहे.
पण असे गुन्हे घडूच नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतच असतो. या अनुषंगाने आज राज्य महिला आयोगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी मा. जिल्हाधिकारी पुणे, डीसीपी झोन-2 पुणे शहर पोलीस, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक पुणे, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, स्वारगेट डेपो मॅनेजर यांच्या उपस्थितीत सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित केली आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.