क्वांटम तंत्रज्ञानासाठीचे संशोधन आता अधिक अचूक
पुणे : द्विमितीय क्वांटम पदार्थाच्या विश्लेषणाचा वेग एक हजार पटींपर्यंत वाढवू शकणाऱ्या अनोख्या संयंत्राचा शोध लावण्यात आला आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (आयसर पुणे) आणि जर्मनीच्या म्युन्स्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संयंत्राचे संशोधन केले असून, भविष्यातील क्वांटम तंत्रज्ञानाच्या संशोधनाला प्रचंड गती मिळण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकणार आहे. ऊर्जाबचत आणि वेगवान प्रक्रियांसाठी भविष्यात क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. त्यासाठी जगभरात मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे. भविष्यातील इलेक्ट्रॉनिक्स संयंत्रे क्वांटम तंत्रज्ञानापासून तयार होण्यासाठी द्विमितीय पदार्थावर (टूडी मटेरिअल्स) आणि त्यांच्या चुंबकीय अवस्थांवर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. द्विमितीय पदार्थाच्या विश्लेषणासाठी वापरात असलेली प्रक्रिया वेळखाऊ असल्याने त्यावरील उपाय आयसर शास्त्रज्ञ डॉ. आशिष अरोरा यांच्या नेतृत्वातील संशोधक गटाने शोधला.
या संशोधनाचा शोधनिबंध ‘स्मॉल मेथड्स’ या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. द्विमितीय पदार्थाचे विश्लेषण किंवा त्यांचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी फॅराडे रोटेशन तंत्र वापरण्यात येते. त्यात प्रकाशकिरणांमुळे पदार्थावर होणारे परिणाम किंवा त्यांच्या रचनेतील बदल तपासता येतात. सध्या प्रत्येक तरंगलांबीसाठी स्वतंत्र निरीक्षणे नोंदवावी लागत असल्याने या प्रक्रियेत बराच वेळ जातो.