फुकट बिर्याणीवरून राडा, हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार
![Radha from free biryani, knife attack on hotel manager](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/hanamari.jpg)
पुणे | पुण्यातील सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुकट ची बिर्याणी न दिल्याच्या कारणावरून तीन तरुणांनी हॉटेल मॅनेजर वर कोयत्याने सपासप वार करत त्यांना जखमी केले. शनिवारी रात्री हिंगणे खुर्द परिसरातील रिबेल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.याप्रकरणी लक्ष्मण मरीबा सोनवणे (वय 24) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सत्या वानखेडे, बाळा आणि तेजा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री फिर्यादी हे रिबेल फोल्डर्स या हॉटेलच्या बाहेर थांबले होते. यावेळी आरोपीने हॉटेलचे मॅनेजर असलेल्या बिरास्वर दास त्यांच्याकडे फुकट बिर्याणी मागितली. परंतु मॅनेजरने बिर्याणी फुकट देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याच्या हातावर कोयता मारून जखमी केले. तर आरोपी सत्या वानखेडे यांनी किचन मध्ये असलेल्या फ्रिजवर कोयत्याने मारून नुकसान केले. तर अन्य एक आरोपी असलेल्या तेजा याने गल्यातील 940 रुपये काढून घेतले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे