पुणे महिला लेफ्टनंट कर्नल आत्महत्या प्रकरणी हिमाचलमधील ब्रिगेडीयरवर गुन्हा
![Pune woman lieutenant colonel commits suicide in Himachal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/images-30-1.jpeg)
पुणे – शहरातील वानवडी परिसरात बुधवारी सकाळी लष्कराच्या मिलेक्ट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील लेफ्टनंट कर्नल पदावरील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आज पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल केला आहे.
रश्मी आशुतोष मिश्रा असे आत्महत्या केलेल्या कर्नल पदावरील महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकाऱ्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. अजित मिलू असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पुण्यातील वानवडी भागात मिलिक्ट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो ही प्रशिक्षण संस्था आहे. इथे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पॅरा मिलिटरी फोर्स, नागरी गुप्तचर संस्था यामधील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी रश्मी मिश्रा या मृतावस्थेत आढळल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रश्मी मिश्रा या मूळ जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समधे पोस्टिंगला होत्या. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यातील तीन महिन्यांचे ट्रेनिंग पूर्णही झाले होते. त्यांचे पती देखील कर्नल आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.