पुणे महानगरपालिकेचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात मोठा निर्णय
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी
![Pune, Municipal Corporation, Plaster, Off, Paris, Idols, Big, Decision,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/plaster-of-parisa-780x470.jpg)
पुणे : पुणे महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेने पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. गणपती किंवा इतर कोणत्याही सणांच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्ती बनवल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने यासंदर्भात आदेश काढले आहे.
पुणे मनपाचा काय आहे आदेश
केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभागाकडून यापूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करण्याऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक जैविक घटक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती तयार कराव्या, असे पुणे महानगरपालिकेने म्हटले आहे. तसेच सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच / रहिवासी संकुलातील टाकीमध्ये अथवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा – शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे शिवजयंतीला लोकार्पण; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
ठाण्यात यापूर्वी बंदी
पुणे मनपापूर्वी ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरात प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींच्या विक्रीवर बंदी घातली होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण (संरक्षण) कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला होता. माघी गणपतीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असणाऱ्या मंडळांना मुंबई मनपाने नोटीस दिल्या होत्या. त्यासंदर्भातील मुद्दा शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
उच्च न्यायालयाने, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मूर्ती बनवण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. मूर्तीकारांनी मूर्ती रंगवण्यासाठी हळद, चंदन आणि गेरूचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. फुले, कपडे आणि इतर पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे, असेही म्हटले आहे.
दरम्यान मूर्तीकर संघटनांनी पीओपी मूर्ती बंदीच्या निर्णयास विरोध केला आहे. यामुळे लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, असे मूर्तीकर संघटनेचे पदाधिकारी हितेश जाधव यांनी सांगितले.