Pune: कोरोनाग्रस्त १० रुग्णांची प्रकृती स्थिर, २३ जणांचे अहवालही निगेटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/13-5.jpg)
पुणे |महाईन्यूज|
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जीम, चित्रपटगृहे, नाट्यगृहेही बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. शाळांना सुट्या आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी बाहेर फिरु नये. त्यांनी घरातच सुरक्षित राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मागील २४ तासातील २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून पुण्यात आढळून आलेल्या १० पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले की, लोक आता स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांच्यात काही लक्षणे दिसत असतील तर ते याबाबत सांगत आहेत. ही सकारात्मक गोष्ट आहे. परदेशातून येणाऱ्यांवर देखरेख ठेवली जाणार आहे. सुट्या मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेर खेळायला जाऊ नये. दहावी आणि बारावीची परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होतील. ज्यांच्या परीक्षा नाहीत, त्यांनी घरातच थांबावे. परराज्यातील विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी गेल्यास त्यांनी तिथेच राहावे. त्यांनी पुण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दुय्यम दर्जाचे सॅनिटायझर विकत असलेल्या तिघांवर पुण्यात कारवाई करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.