breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; जिल्ह्यात किती आहेत मतदार?

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांनी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती सादर करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या प्रारुप मतदार यादीत जिल्ह्यात 8 हजार 417 मतदान केंद्रावर एकूण 84 लाख 39 हजार 729 मतदार असून त्यापैकी 44 लाख 3 हजार 344 पुरुष, 40 लाख 35 हजार 640 महिला आणि 745 तृतीयपंथीय मतदार आहेत.

याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे, राहुल सारंग आदींसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. दिवसे म्हणाले, नागरिकांकडून दाखल दावे व हरकती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून 29 ऑगस्टपर्यंत निकाली काढल्या जाणार आहेत. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत जिल्ह्यात 10, 11, 17 आणि 18 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा कसे याबाबत मतदारांनी खात्री करुन घ्यावी. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 30 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या दहा दिवस पूर्वीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येईल.

हेही वाचा –  बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर मतदारांची संख्या साधारण समान करण्याच्या प्रक्रियेद्वारे जिल्ह्यातील 662 मतदान केंद्रावर काही मतदारांच्या मतदान केंद्रात बदल होणार असून त्यांना त्याच इमारतीतील दुसऱ्या  मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. या बदलाची माहिती राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी मतदारांना द्यावी.

बाहेरील जिल्ह्यातील जुने एमटी सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे, मतदार यादीत नाव, पत्ता, छायाचित्रात दुरुस्ती करावयाची असल्यास तशी दुरूस्ती करुन मतदार ओळखपत्र बदलून घ्यावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे. कळसकर म्हणाल्या, प्रारुप मतदार यादी शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, पुणे येथे ठेवण्यात आली असून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी घेवून जावी. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध अंतिम यादी व आज प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारुप यादी तुलनात्मक पद्धतीने तपासून घ्यावी.

दावे व हरकती सादर करताना वोटर हेल्पलाईन ॲप किंवा संकेतस्थळाचा वापर करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती सादर करता येईल. ऑफलाईन पद्धतीने दावे व हरकती सादर करताना एका दिवशी एका व्यक्तीकडून 5 अर्जच स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यात मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही मोहिमस्तरावर सुरू असून यामध्ये मयतांचे नातेवाईक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घेवून सहकार्य करण्याचे आवाहन श्रीमती कळसकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button