एल्गार परिषदप्रकरणी 15 जणांविरोधात देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाचा प्रस्ताव
पुणे | पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या 15 जणांविरोधात ‘देशाविरुद्ध युद्ध पुकारण्या’चा आरोप लावण्याचा निर्णय राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) घेतला आहे.देशाविरोधात युद्ध पुकारणे, राष्ट्रद्रोह, समाजात वैर पसरवणे, गुन्ह्याचा कट रचणे, तसेच UAPA अंतर्गत असलेले कलमांअन्वये आरोप करण्यात आले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास याची कमाल शिक्षा मृत्यूदंडाची असते.
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या महिन्याच्या सुरुवातीलाच विशेष कोर्टासमोर आरोपांचा मसुदा सादर केला होता. या आरोपांच्या मसुद्यानुसार, ‘आरोपींनी सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हत्या किंवा तशी स्थिती निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र जमवण्याचा कट रचला. ‘प्राथमिक चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आरोपपत्रात म्हटले होते की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या मसुद्यात अचूक आरोप लावण्यात आलेले नाही आणि या प्रकरणात गोळा करण्यात आलेले पुरावे सुनावणीचा भाग असतील. पुणे पोलिसांनी एक पत्र सापडल्याचेही सांगितले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोप ठेवला आहे की, 15 आरोपी बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेशी संबंधित आहेत. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेचा उद्देश दलित आणि इतर जातींमध्ये भावना भडकवून महाराष्ट्र, भीमा कोरेगाव आणि पुणे जिल्ह्यात जातीच्या नावावर हिंसा, अस्थिरता आणि आराजकता पसरवणे हा होता, असा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने लावला आहे.ज्येष्ठ विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुरावे मिटवण्याचा आरोपही लावण्यात आला आहे. या आरोपांच्या मसुद्यात फादर स्टेन स्वामी यांचाही उल्लेख आहे. स्वामी यांचे गेल्या महिन्यात पोलीस कोठडीतच मृत्यू झाला.