पेट्रोल, डिझेल नाही; पण महाराष्ट्रात दारू स्वस्त होणार
पुणे | पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली आहे. दरम्यान, मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करत काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला आहे. याचवेळी सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या दारुवरील उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे दारू मात्र स्वस्त होणार आहे.उत्पादन शुल्क विभागाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. यानुसार, विदेशातून आयात झालेल्या स्कॉच व्हिस्कीच्या एक लिटरच्या बॉटलची किंमत 5 हजार 800 रुपये ते 14 हजार रुपयांदरम्यान असेल तर त्यावरील कर 35 ते 40 टक्के कमी होईल.विदेशातून आयात होणाऱ्या दारूतून राज्य सरकारला 2016-17 ते 2018-19 या कालावधीत 200 कोटी रुपये उत्पादन शुल्क मिळाला होता. परंतु, 2019-20 ते 2020-21 या कालावधीत हा उत्पादन शुल्क 100 कोटी रुपयांवर आला होता. विक्री करात वाढ झाल्याने ही घट झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार, विदेशातून आयात होणाऱ्या दारूवरील कर 300 वरून 150 टक्क्यांवर आणले आहेत. आता दारूची किंमत कमी करण्याचा निर्णय दारू कंपन्या घेतील. हा निर्णय सोमवारी घेतला जाण्याची शक्यता आहे.