पुणे मेट्रोतून सायकल नेण्यास मुभा, तिकीट दर दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर
![Permission to take bicycles from Pune Metro, ticket price on the lines of Delhi Metro](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210826-WA0005.jpg)
पुणे – पुणे मेट्रो डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असून तिकीट दर हे दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर असणार आहेत. तसेच प्रवाशांना सायकल सोबत घेऊनही या मेट्रोतून प्रवास करता येणार आहे असे पुणे मेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षितांनी जाहीर केले.
पुणे मेट्रो प्रवासात पहिल्या किलोमीटरसाठी प्रवाशांना दहा रुपये मोजावे लागतील. प्रवास जितका वाढेल तसा दर कमी होत जाईल. डिसेंबर पूर्वी पिंपरी पालिका ते फुगेवाडी असा सात किलोमीटर तर कोथरूड ते गरवारे महाविद्यालय असा पाच किलोमीटर प्रवास खुला केला जाणार आहे.पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गावर पुणे मेट्रो धावणार आहे. यापैकी वनाज ते रामवाडी या मार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिरवा कंदील दाखविला आणि मेट्रोची पहिली अधिकृत ट्रायल रन नुकतीच पार पडली. त्यानंतर आज पिंपरी ते स्वारगेट मार्गावर आज ट्रायल रन पार पडली. ही ट्रायल रन सायकल घेऊन प्रवासी कसे प्रवास करू शकतात हे प्रत्यक्षात मेट्रोने दाखविले.तसेच मेट्रोच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नव्हे तर थेट सायकल घेऊन मेट्रोत प्रवास करू शकता येणार आहे. यासाठी वेगळे तिकीट काढण्याची ही गरज नसेल.
प्रवाश्यांना हा प्रवास नेमका कसा करता येणार, याचे आज प्रात्यक्षिक पार पडले. सायकल तुम्ही लिफ्टने मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन आलात की मेट्रोत तुम्हाला प्रवेश करता येईल. प्रवेश केल्यानंतर मेट्रोच्या दोन्ही बाजूकडील या कोपऱ्यात सायकल पार्क करता येणार आहे. मग तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे तुम्ही पोहोचू शकता. तिथे मेट्रोतून सायकल बाहेर घेऊन तुम्हाला तुमची कामे उरकता येणार आहेत.