तीन ठिकाणी पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावले, गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/mobile-chori-crime.jpg)
पुणे | रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हेरून त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंडगार्डन, वानवडी आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत.
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ससून हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून फिर्यादी सोमनाथ कुलकर्णी (वय 19) जात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या हातातील बाराशे रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला होता. बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास करत रोहित विजय शिंदे (वय 21) या आरोपीला अटक केली.
वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुसऱ्या घटनेत फिर्यादी नितीन कांतीलाल मोहिते (वय 35) सय्यद नगर येथील रेल्वे गेट जवळून जात असताना दोन आरोपींनी त्यांना लुबाडणेच्या उद्देशाने त्यांच्याजवळील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन बळजबरीने चोरून नेला. मोहिते यांनी तक्रार दिल्यानंतर वानवडी पोलिसांनी शादाब युसुफ अन्सारी (वय 19) आणि फौय्याज शिराउद्दीन अन्सारी (वय 21) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका घटनेत फिर्यादी साक्षी विकास लाड (वय 25) या ऑफिस सुटल्यानंतर मित्राची वाट पाहत असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेऊन गेला. कोंढव्यातील गोकुळ नगर परिसरात हा प्रकार घडला.