‘राज्यात नो डिनायल पॉलिसी लागू’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुण्यातील रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी सर्व रुग्णालयांना नवीन प्रणाली आणि कठोर नियम लागू करण्यासाठी राज्य शासन नवे धोरण लागू करणार आहे. त्यानुसार कोणतेही रुग्णालयाने नागरिकाला अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवू नये, यासाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आरोग्यसेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक आदी उपस्थित होते.
हेही वाचा – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे जोरदार प्रत्युत्तर; ५ अतिरेक्यांची घरे जमीनदोस्त
आबिटकर म्हणाले, आरोग्यसेवा पुरविण्यात पुणे राज्यातील दुसरे शहर असून, आरोग्य विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आल्यानंतर प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता येण्यास मदत होणार आहे. तसेच शहरी भागात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. पुण्यात यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा केंद्र आणि रेण्वीय निदान प्रयोगशाळा करणार आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाने आतापर्यंत विविध महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. दरम्यान, पहलगाम येथे मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जागतिक हिवताप दिनानिमित्त काढलेल्या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रास्ताविक आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक यांनी केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार घ्या आणि आपले मानसिक आरोग्य चांगले राखून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा दिली पाहिजे.”
– अजित पवार,उपमुख्यमंत्री